योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी योगी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनी आणि इतर ५० मंत्र्यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या केशवप्रसाद मौर्य यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली. मौर्य यांच्यासह ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात नक्की कोणा-कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. योगी मंत्रिमंडळात पहिल्या टर्ममधील काही चेहरे कायम ठेवण्यात आले असून यावेळी काही चेहरे नव्याने सामील करण्यात आले आहेत.
योगींच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश… ?
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विविध कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी राणी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दुसरीकडे, नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रविंद्र जयस्वाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालू यांनी राज्यमंत्रिपदाची (स्वतंत्र प्रभार) शपथ घेतली.