१० जानेवारी २०२०,
यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’वर अर्जुन पुरस्कार विजेते माजी मल्ल व कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे वर्चस्व राहिले. एकूण २२ पदके पवार यांच्या कुस्ती संकुलातील मल्लांनी पटकावली. मात्र पवार अर्थातच तेवढय़ावर समाधान मानणारे नाहीत. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकची संधी हुकली असली तरी २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतून पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक देशाला मिळवून देणारा मल्ल महाराष्ट्रातून घडवेन, असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा किताब १० वर्षांच्या महत्प्रयासानंतर तालमीला मिळूनसुद्धा पवार तेवढय़ावरच थांबले नाहीत. बुधवारी सकाळपासूनच पवारांनी त्यांच्या मल्लांना पुढच्या स्पर्धाना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. सत्कार समारंभ सुरू असले तरी सराव हा झालाच पाहिजे, असे पवारांनी त्यांच्या प्रत्येक पदकविजेत्या मल्लाला बजावले.
‘‘कुस्तीतून पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक हे खाशाबा जाधव यांच्या रूपाने महाराष्ट्राने देशाला मिळवून दिले. त्यानंतर अनेक वर्षे कुस्तीतून देशाला पदके मिळण्यासाठी लागली होती. अजून सुवर्णपदक हे कुस्तीतून देशाला मिळालेले नाही,’’ अशी खंत त्यांनी प्रकट केली.
वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा लवकरच रायगड जिल्ह्य़ात होणार आहे, अशी माहिती क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. ही स्पर्धा रोहा येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच स्पर्धेद्वारे वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड केली जाणार आहे.