भारताला अनेक खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यात मुलीच अग्रेसर राहतील असे मत क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड येथील कुस्तीपटू प्रगती गायकवाड हिने ५४ किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रांची येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. केंदळे यांनी राहत्या घरी जाऊन प्रगतीचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते.
पहिलवान प्रगती गायकवाड हिने कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. रांची येथील गणपतराय स्टेडियमवर या स्पर्धा झाल्या. ५४ किलो वजनगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तिने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.या वजनगटात जवळजवळ १८ राज्यांच्या महिला कुस्तीगीर सहभागी होत्या. पहिल्या फेरीत प्रगती हिने पंजाबची महिला पहिलवान ख्वाईश हिला गुणफलक १०-० ने हरविले. दुसऱ्या फेरीत चंदीगडची महिला पहिलवान काजल हिला गुणफलक १०-० ने हरविले. उपांत्यफेरीत दिल्लीची महिला पहिलवान सिमरन हिच्याबरोबर झालेल्या चित्तथरारक लढतीत सिमरन हिला गुणफलक ८-५ हरविले. सेमिफाईनल कुस्ती लढतीत हरियाणाची महिला पहिलवान मुस्कान हिस एकतर्फी चितपट करीत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
प्रगतीने केलेल्या प्रगतीविषयी बोलताना क्रिडा सभापती केंदळे म्हणाले की, “अजूनही मुलींच्या कुस्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप चांगला नाही. मात्र, लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे, की भविष्यात भारताला ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील सुवर्णपदक मुलीच मिळवून देऊ शकतील. याचे प्रमुख कारण म्हणजे मुली मुळातच जिद्दी आणि ध्येयवेड्या असतात. या मुलींना केवळ प्रोत्साहन आणि पाठबळ आवश्यक असते. कुस्ती या खेळावरील पुरुषांची मक्तेदारी महिला कुस्तीपटूंनी कधीच मोडीत काढली आहे, याचा प्रत्यय रांची येथे झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाड ने मिळवलेल्या सुवर्णपदकाने दिलाच आहे.” मुलींच्या कुस्तीसाठी महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. येणाऱ्या काळातही मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान कसे भेटेल यावर मी जातीने लक्ष घालत आहे.