आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नायजेरिया या देशामधून दि.२५/११/२०२१ रोजी आलेल्या ०२ नागरिकांचे दि.२९/११/२०२१ रोजी कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर ०२ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोविड -१९ चाचणी करण्यात आलेली असून यामधील संपर्कातील ०१ व्यक्तीचा दि.३०/११/२०२१ रोजी कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. तसेच या नागरिकांचे नवीन ‘ओमिक्रॉन ’ या करोनाच्या व्हेरिएंटच्या तपासणी कामी घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंग करिता एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.
नायजेरिया मधून आलेल्या ०२ व संपर्कातील ०१ अशा ०३ रुग्णांचे कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेले असून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे व संपर्कामधील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांची प्रकृती स्थीर आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणू आढळून येत असून नायजेरिया या देशामध्ये सदर विषाणू अद्याप आढळून आलेला नाही.