महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ” विशेष सन्मान ” विदर्भाच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रातिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तुत्ववान कामगिरीने अनेक प्रश्न मार्गी लावणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे, उद्योग क्षेत्रात आपल्या कामगिरीने भरारी घेणा-या आर्किटेक्ट शीतल अर्जुनवाडकर, तसेच सिनेक्षेत्रात आपल्या फोटोग्राफीने उत्तुंग शिखर गाठणा-या अभिनेत्री स्वप्ना पाटसकर यांना गौरवविण्यात आले.
त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रामाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्त्या भारती फरांदे उपस्थित होते. इंगोले यांनी सन्मानर्थी महिलांच्या कर्त्तृत्वाबद्दल विशेष कौतुक करुन महिलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात आघाडी घेण्याचे आवाहन करुन मार्गदर्शन केले. सन्मानार्थीनी गौरवास उत्तर म्हणून आपले मनोगत मांडून आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात….
निशिगंधाच्या फुलास आहे सुवास आई
गर्भात लेकराच्या असते श्वास ती आई
या ओळीतून कवयित्री निशिगंधा काकडे यांनी
तर
माझ्या माहेरच्या अंगणात गुलमोहर कन्हेरं
बारा महिने असतो तेथे पाना फुलांचा बहरं
या ओळींमधून कवयित्री रेणुका हजारे यांनी कवयित्री काव्य संमेलनात बहर आणली.
या व्यतिरीक्त एकाहून एक अनेक सरस आशयघन कविता टाळ्यांच्या गजरात सादर करण्याचा मान उपस्थित वैशाली गावंडे, करणा कंद, कमल सोनजे, मंगला पाटसकर, रजनी अहेरराव, आशा नष्टे, अंजली नवांगूळ, सुनिता बोडस, प्रतिभा कुलकर्णी, जयश्री थोरवे, भारती फरांदे विनीता श्रीखंडे, योगिता कोठेकर, आदि कवयित्रीना मिळाला.
राजन लाखे यांनी प्रास्तविक केले, माधुरी मंगरूळकर, जयश्री श्रीखंडे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ, श्रीकांत जोशी, प्राची कुलकर्णी, दत्तू ठोकळे, किशोर पाटील, हेमंत जोशी यांनी संयोजन केले.