पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय गाडे शिरूर परिसरातील असून, त्याच्यावर यापूर्वीही शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तैनात केली असून, डॉग स्कॉडच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
पीडित तरुणी फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्याने तिला सांगितले की, साताऱ्याला जाणारी बस येथे थांबत नाही, ती दुसरीकडे उभी आहे. तरुणीने सुरुवातीला विरोध केला, मात्र आरोपीने पुन्हा तिचा विश्वास जिंकत तिला जवळच्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार असल्याचे पाहून तरुणीने विचारणा केली, त्यावर आरोपीने
सांगितले की “बस रात्री उशिराची असल्याने लाईट बंद आहेत.” पीडितेने मोबाईल टॉर्च लावून पाहायला सुरुवात केली, तेव्हा आरोपीने बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दत्तात्रय गाडे: एक सराईत गुन्हेगार. दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चेन स्नॅचिंग आणि अन्य गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.
पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी धाड टाकली, मात्र तो तेथे सापडला नाही. आरोपी फरार असून, त्याच्या शोधासाठी विविध पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. महिला सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातील सर्वाधिक गर्दीचे आणि सुरक्षित मानले जाणारे ठिकाण आहे. येथे २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, अशा ठिकाणी हा संतापजनक प्रकार घडल्याने महिला सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.