Saturday, March 2, 2024
Homeआरोग्यविषयककमी झालेल्या कोरोनासंसर्गामुळे हिंजवडीतील 'विप्रो' रुग्णालय कायमचे बंद..

कमी झालेल्या कोरोनासंसर्गामुळे हिंजवडीतील ‘विप्रो’ रुग्णालय कायमचे बंद..

करोनासंसर्गात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सोयीसुविधेसाठी हिंजवडीतील विप्रो कंपनीच्या इमारतीत उभारलेले रुग्णालय आता कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयातील विविध ७१ प्रकारची उपकरणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने जाहीर केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा परिषदेने हिंजवडीत विप्रो कंपनीच्या इमारतीमध्ये भागीदारीत (पीपीपी) रुग्णालय उभारले. त्यामुळे विप्रो रुग्णालयात दुसऱ्या लाटेत दाखल झालेल्या रुग्णांना मदत होऊ शकली. परिणामी, करोनाच्या तिसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अधिक असली, तरी गंभीर रुग्णसंख्या अत्यल्प ठरली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात हिंजवडी येथील रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेने १५ कोटी ३३ लाख रुपये, तर ‘विप्रो’ने २४ कोटी आठ लाख रुपये खर्च केले होते.

आता हिंजवडीच्या विप्रो रुग्णालयाची इमारत ही विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (एसईझेड) समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे विप्रोच्या या इमारतीचा उपयोग करता येणार नाही. या संदर्भात विप्रोच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक झाली. त्या बैठकीत ही इमारत आयटी कंपनीच्या विस्तारासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयात बसविण्यात आलेली ७१ प्रकारची उपकरणे जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपकेंद्रांना आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहे. रुग्णालयातील पोर्टेबल व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर (लहान-मोठे), ईसीजी मशिन, फ्रीज, मोबाइल एक्स रे मशिन; याशिवाय अन्य प्रकारच्या वस्तू सरकारी रुग्णालयांना मिळणार आहेत.

करोनाकाळात विप्रो कंपनीच्या मदतीने जिल्हा परिषदेने हिंजवडीत कोव्हिड रुग्णालय सुरू केले होते. ३१ डिसेंबरपर्यंत या रुग्णालयात रुग्णांना उपचार देण्यात आले. आता रुग्णालय बंद करण्यात आले असून, रुग्णालयातील ७१ प्रकारच्या वस्तू जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना गरजेनुसार देण्यात येणार आहेत. या रुग्णालयामुळे संसर्गात रुग्णांना खूप मोलाची मदत झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments