Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीभाजपात होणार खांदे पालट...? चंद्रकांत पाटील यांच्याजागी शेलार किंवा बावनकुळे ?

भाजपात होणार खांदे पालट…? चंद्रकांत पाटील यांच्याजागी शेलार किंवा बावनकुळे ?

७ ऑगस्ट २०२१,
भाजप आमदार अॅड. आशिष शेलार सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पाठोपाठ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांची भेट घेतली आणि नंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं दिल्लीत लँड होणं हा घटनाक्रम अनेक अर्थांनी महत्त्वाचा आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांची ही स्वतंत्रपणे दिल्लीवारी नेमकी कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नसला तरी पडद्यामागे बरचं काही घडतंय, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्र भाजपात सर्वकाही आलबेल आहे, असं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात श्रेष्ठींच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय, अशी चर्चा गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यात महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व बदलून धक्कादायक निर्णय केंद्रीय नेतृत्व घेऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना पदावरून दूर करून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आमदार आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. शेलार यांच्यासोबतच विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव चर्चेत असून ओबीसी चेहरा म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज नसलं तरी येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेसह अनेक प्रमुख पालिकांच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने रणनीतीचा भाग म्हणून नेतृत्वबदलाची खेळी खेळण्याच्या विचारात भाजप आहे. त्यात शेलार यांच्या नावाला अमित शहा यांची पहिली पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिका निवडणुका भाजपने लढल्या होत्या. त्यात भाजपला चांगले यश मिळाले होते. शिवसेनेसाठी हे निकाल धोक्याची घंटा ठरतील असे तेव्हा बोलले गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी दिल्यास येत्या पालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होईल, असे गणित मांडले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून आशिष शेलार हे राज्यभरात दौरा करत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागांत जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. संघटनात्मक पातळीवरील हे दौरे निश्चितच कुणाच्यातरी सांगण्यावरून सुरू आहेत, हे स्पष्ट असून शेलार यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतल्याने काहीतरी ठरतंय हे पक्कं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र इन्कार केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments