६ एप्रिल २०२१,
गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच दुपारी गृहमंत्रीदाचा चार्ज घेणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले, असं राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. वळसे-पाटील यांनी अजून गृहमंत्रीपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली नाहीत. ते आज दुपारी 3 वाजता पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज सिल्व्हर ओक निवासस्थानी येऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
पवारांचं मार्गदर्शन घेतलं
मी पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतलं. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली, असं वळसे-पाटील म्हणाले. गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडायला आवडेल, असं सांगतानाच आज दुपारी 3 वाजता गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांना शरद पवारांसोबत काय चर्चा झाली असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून मार्गदर्शन घेतलं आहे”.. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्याकडील कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.