मावळ लोकसभेचा प्रचार शिगेला पोहचला आहे , मात्र कालच्या एका घटनेने पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात मात्र जोरदार तापले आहे, काल रात्री पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळी गाठी- भेटीचा कार्यक्रम होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते ही कार्यक्रमाला हजर होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले.परंतु अजित दादांनी याकडे दुर्लक्ष करत माईकवर बोलणे चालूच ठेवले , त्यानंतर दोघेही स्नेहभोजनासाठी गेले तिथेही अजित पवार वाघेरे यांना बोलले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे हे शिवबंधनात अडकले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली.
या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना संजोग वाघेरे म्हणाले, महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. आणि हीच महाराष्ट्रातील खेळी – मेळीच राजकीय संस्कृती जपण्यासाठी मी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यात वावगं काही नाही. परंतु या प्रसंगाची सध्या चर्चा पिंपरी चिंचवड शहरात जोरात सुरू आहे.


