Tuesday, April 21, 2026
Homeआंतरराष्ट्रीयपिंपरी-चिंचवडकरांच्या अस्मितेचा अपमान सहन करणार नाही” — आमदार शंकर जगताप यांची  आयुक्तांच्या वक्तव्यवरुन तीव्र नाराजी  

पिंपरी-चिंचवडकरांच्या अस्मितेचा अपमान सहन करणार नाही” — आमदार शंकर जगताप यांची  आयुक्तांच्या वक्तव्यवरुन तीव्र नाराजी  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आमदार शंकर जगताप यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आमदार जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, पिंपरीचिंचवडकरांच्या अस्मितेचा अपमान खपवून घेतलाजाणार नाही.” शहराच्या गौरवशाली इतिहासाचा आणि कष्टकरी भूमिपुत्रांच्या योगदानाचा अवमान करणारे असे वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड ही संत परंपरेची आणि क्रांतीची भूमी असल्याचे नमूद करत, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चापेकर बंधू यांच्या बलिदानाने या शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर झेपावत असताना, पिंपरी-चिंचवडने औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे शहर ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘आयटी हब’ म्हणून विकसित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टाटा, मर्सिडीज बेंझ आणि फोक्सवॅगनसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे शहराची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली असल्याचे सांगत, स्थानिक नागरिकांच्या त्यागातून हे वैभव उभे राहिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

शेवटी, आयुक्तांनी अशा विधानांपासून दूर राहून महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणावी आणि प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही आमदार जगताप यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments