राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मास्कमुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विविध संघटनांकडून राज्य शासनाकडे अशा प्रकारची मागणी देखील झाली आहे. यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रातील टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्र राजेश टोपे यांनी दिलं आहे. गुढीपाडव्याला आणखी तीन दिवस उरले असून तोपर्यंत यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, नंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. मात्र गुढीपाडव्याला आपल्या कडे प्रत्येकाच्या घरी वैयक्तिकपणे गुढी उभारण्याची परंपरा असून त्या उत्साहाला कुठेही निर्बंध नाहीत. नागरिकांनी हा सण उत्साहाने साजरा करावा, असं टोपे यांनी सांगितलं. तसेच इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू असूनही आपल्याकडे बस, रेल्वे, हॉटेल्स, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणांवर फार निर्बंध नाहीत. फार कमी नियम ठेवण्यात आले आहेत. याची जाणीव ठेवत नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
मास्कमुक्तीबाबत काय म्हणाले ?
राज्यात गुढीपाडव्याला अनेक भागात मोठ्या शोभायात्रा निघतात. यावेळी मास्कमुक्तीचा निर्णय व्हावा, अशी मागणी केली जातेय. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘ दुसऱ्या देशांमध्ये चौथ्या लाटेचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे अगदीच मास्क घालयचा नाही. अशी हिंमत आपण करू शकणार नाही. नागरिकांसाठी ते हितकारक आहे. आपल्याला संसर्ग झाला असेल तर इतरांना संसर्ग होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्तीचा विचार नाही. चौथ्या लाटेबाबत डेस्टा प्लस, ओमायक्रॉन तसं डेल्टाक्रॉनबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यात आला आहे. टास्क फोर्स व विविध संस्था या क्षेत्रात सातत्याने काम करत असतात. जगात, देशात काय चाललंय, प्रतिबंधक योजनांबाबत मार्गदर्शन करत असतं. निर्बंधांसंदर्भात मागण्या येतात. आम्ही टास्क फोर्सपर्यंत या मागण्या पोहोचवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेत असतो. गुढी पाडव्याबद्दलचा निर्णयही त्यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लसीकरणाची स्थिती काय.. ?
राज्यातील लसीकरणाची स्थिती सांगताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढील आकडेवारी सांगितली. तसेच लसीकरणाबाबत 100 उद्दिष्टपूर्तीचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
– 18 च्या पुढील पहिल्या डोसचे प्रमाण 92 टक्के आहे. दुसऱ्या डोसचे प्रमाण 74 टक्के आहे. म्हणजे 25 टक्के अजून दुसरा डोस घेणारे बाकी आहेत.
– 15 ते 18 वयोगट किंवा 12 ते 15 वयोगट या दरम्यान शालेय विद्यार्थी आहेत. 26 टक्के लसीकरण झालं आहे.
– 15 ते 18 वयोगटात 62 टक्के नागरिकांचा पहिला डोस , तर दुसरा डोस 40 टक्के नागरिकांनी घे झाला आहे. त्याचंही प्रमाण वाढतंय. संख्या पूर्णत्वाला न्यायची आहे. 100 टक्के टार्गेट पूर्ण करायचं आहे.