राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडामध्ये शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांचाही समावेश असल्याने पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी अजित पवारांवर कारवाई करणार का? यावरही पवारांनी भाष्य केलं आहे.
अजित पवारांवर कारवाई करणार का?
अजित पवारांच्या बंडानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. पवार म्हणाले, हा पक्षाच्या धोरणाचा निर्णय नाही, ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक आहेत, ते बसतील आणि निर्णय घेतली. त्यामुळे बाकीचे नेते आहेत. जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय घेतील. मी पक्षप्रमुख म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक केली आहे. माझं त्यांना सांगणं आहे, पक्षासाठी जी पावलं टाकली पाहिजे होती, ती त्यांनी टाकली नाही. त्यामुळे ज्यांनी जबाबदारी टाकली त्यांचा आता विश्वास राहिला नाही. त्यासाठी उचित कारवाई करावी, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागले. पक्षाच्या चौकटीबाहेर गेले, चौकट घेऊन गेले, त्या प्रत्येकांचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा आणि प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागणार आहे.