Friday, September 13, 2024
Homeताजी बातमीखरी शिवसेना कोणाची..? पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे ? कागदपत्रे सादर करण्याची...

खरी शिवसेना कोणाची..? पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे ? कागदपत्रे सादर करण्याची मुदत आज संपुष्टात

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. त्यानंतर दोन-चार दिवसांत आयोगाचा निर्णय अपेक्षित आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे दिली होती. आयोग आता त्याधर्तीवरच अंतिम निर्णय देणार की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यात एका गटाला यश मिळणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील ४० आमदार व १३ खासदार आपल्याबरोबर असून राष्ट्रीय कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे खरी शिवसेना आपलीच असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेनेच्या घटनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदी झालेल्या निवडीला शिंदे गटाने आयोगापुढे आक्षेप घेतला आहे.

तर ठाकरे गटाने शिंदे गटाचे आक्षेप खोडून काढून आमदार अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना याप्रकरणी आयोगाने निर्णय देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. विधानपरिषदेतील आमदार व राज्यसभेतील खासदार आपल्याबरोबर आहेत. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत, त्यांची छाननी करावी, आदी मुद्दे ठाकरे गटाने मांडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारीला संपली आहे.

आम्ही आमची कागदपत्रे व लेखी युक्तिवाद आयोगापुढे सादर केले आहेत. आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा असून आम्हाला न्याय मिळेल, अशी खात्री आहे. -अनिल देसाई, ठाकरे गटाचे खासदार

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments