मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. राज ठाकरे हे माझे दैवत आहेत, होते आणि राहतील असं त्या म्हणाल्या आहेत. मी मुंबईला काल वैजापूर ऑनर किलिंग संदर्भात अजित पवार यांची भेट घेतली. याशिवाय युवा सेनेच्या वरुण सरदेसाई यांची देखील भेट घेतल्याचं रुपाली पाटील यांनी सांगितलं आहे. मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे. मी राज ठाकरे यांच्याकडे पाहूनचं मनसेमध्ये आले आहे. संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे. संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, त्यांना आता उत्तर देणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
संदीप देशपांडे आणि मी भावंड म्हणून काम केलं आहे. मी पण त्यांच्या बरोबरचं तयार झालेली आहे. मी त्यांना सध्या उत्तर देणार नाही. वसंत मोरे असतील, संदीप देशपांडे यांना उत्तर देणार नाही. मी त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देणार नाही. 14 वर्ष काम करत असताना माझ्याकडून सर्वसामान्य लोकांकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत असताना माझ्या पक्षाला, माझ्या नेत्याला त्रास होऊ नये, अशी भूमिका असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं.

मी राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते यांना माझ्या स्वार्थासाठी वाईट बोलणार नाही. मनसेच्या काही नेत्यांसदर्भात मी पक्षाच्या चौकटीत राहून माझी अडचण राज ठाकरे यांना कळवली आहे. परंतु, काही कारणांमुळं मी राजीनामा देत आहे. लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवलं आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
माझ्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ऑफर आहे. माझ्या खळखट्टयाक स्टाईलनं स्वीकारतील त्या पक्षात जाईन. तोपर्यंत माझ्या प्रतिष्ठानचं काम करेन, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.