Wednesday, December 6, 2023
Homeweather updateपुण्यात पाऊस कधी परतणार … ? उत्तर भारतात जोरदार बॅटिंग

पुण्यात पाऊस कधी परतणार … ? उत्तर भारतात जोरदार बॅटिंग

मान्सूनचा पाऊस यंदा उशिरानं दाखल झाला. पुण्यात जुलैच्या पहिल्या १५ दिवसात पावसानं म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. पाऊस कधी सक्रीय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शहर आणि परिसरात जूनपाठोपाठ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची ओढ कायम राहिली आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस वगळता शहरात जोराचा पाऊस झालेला नाही. शहरात १५ जुलैपर्यंत होणाऱ्या पावसाच्या सरासरीच्या जवळपास निम्माच पाऊस या वर्षी झाला आहे. पुढील आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, हा ‘बॅकलॉग’ भरून काढला जाणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शहरात यंदा पावसाचे आगमनच उशिरा झाले. जूनच्या अखेरीस थोडासा पाऊस झाला; पण पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे जूनमध्ये पावसाने सरासरी गाठलीच नाही. त्यानंतर जुलैमध्ये कधी भुरभुर, तर कधी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. पुण्यात शिवाजीनगर येथील हवामान केंद्रांवर एक जून ते १५ जुलै या दरम्यान साधारणत: १४१ मिमी पाऊस होतो. यंदा आत्तापर्यंत फक्त १२९.६ मिमी पाऊस झाला आहे.

पुण्याप्रमाणेच लोहगाव आणि पाषाण या दोन उपनगरांतील केंद्रांवर दर वर्षी पावसाची नोंद केली जाते. येथेही सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच झाला आहे. लोहगाव येथे आतापर्यंत १४० मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत ३६ मिमीने कमी आहे. पाषाण येथे १६९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुण्यात पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

उत्तर भारतात जोरदार बॅटिंग

उत्तर आणि वायव्य भारतामध्ये काही दिवस झालेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत हवामान विभागाच्या ३६पैकी सात उप‌विभागांत सरासरीपेक्षा ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र व कच्छ, पंजाब, हरियाना, पश्चिम राजस्थान, चंडीगड व दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या सात उपविभागांमध्ये प्रचंड पाऊस झाला. हिमाचल प्रदेशात १६८ टक्के पाऊस झाला. सौराष्ट्र व कच्छ या उपविभागात १५९ टक्के जास्त पाऊस झाला. पंजाबमध्ये १२४ टक्के, दिल्लीमध्ये ११० टक्के, राजस्थानमध्ये ३६ टक्के जास्त पाऊस झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments