राज्य निवडणूक आयोगाला सादर झालेला महापालिकेच्या प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा महिनाभरानंतरही हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध न झाल्याने संभाव्य बदलांवरून महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून या आराखड्यावर निर्णय का होत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या आठवड्यात तरी त्यावर निर्णय होणार का अशी विचारणा विद्यमान नगरसेवकांसह राजकीय पक्ष करीत आहेत.
महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला कच्चा आराखडा सादर केल्यानंतर आयोगाकडून महापालिका अधिकाऱ्यांनी सादरीकरण घेतले. त्यामध्ये काही बदल सुचविण्यात आल्याची चर्चा होती. हे बदल आराखड्यात केल्यानंतर तो पुन्हा आयोगाला सादर करण्यात येणार आणि आयोगाकडून तो हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाणार, असे अपेक्षित होते. मात्र, या आराखड्यातील संभाव्य बदलांच्या चर्चानंतर ते झालेत की नाहीत, झाले असतील तर हा आराखडा कधी प्रसिद्ध होणार, याबाबत अद्याप ठोस माहिती देण्यात आलेली नाही.
महापालिकांच्या निवडणुका वेळेत होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. महापालिकांमध्ये किती सदस्यीय संख्या असावी, यासाठी सुरुवातीला बराच काळ गेला. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतरही प्रभागरचनेचा कच्चा आराखडा सादर कधी करायचा, यामध्ये वेळ गेला. त्यामुळे महापालिका निवडणुका वेळेत होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.