17 November 2020.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्वच दिग्गज राजकीय नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
बाळासाहेबांच्या आठवणी जागवून शिवसैनिकांनी आणि नेते मंडळींनी सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
तसेच, भाजपा नेते आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. माजी खासदार नितेश राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन केले असून राणे कुटुंबीय आजही बाळासाहेबांना विसरले नाही, असे म्हटलंय. मात्र, त्याचसोबत निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली.
”बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.”, असे ट्विट निलेश राणे यांनी केलंय.
राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचा वाद महाराष्ट्राला परिचीत आहे. त्यातून दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबीयांवर शाब्दीक बाण चालवले होते. त्यानंतर, राणे पिता-पुत्रांनीही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.