अक्षय कुमार अभिनित ‘ओएमजी २’ या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यातील अक्षय कुमारचा लूक पाहून नेटकऱ्यांनी आधीच त्याला इशारा दिला आहे.
बॉलिवूडच खिलाडी अभिनेता अर्थातच अक्षय कुमार याचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी नुकतीच टीझर कधी रिलीज होणार याची घोषणा केली. या सोबतच त्यांनी अक्षय कुमार अभिनित ‘ओएमजी २’ या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर देखील रिलीज केले. मात्र, आता या पोस्टरवरील अक्षय कुमारचा लूक पाहून नेटकऱ्यांनी आधीच अभिनेत्याला तंबी द्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार अघोरी साधूबाबा आणि शिवभक्ताच्या भूमिकेत दिसला आहे. त्यामुळे आधीच आता अक्षय कुमार याला इशारा देण्यात आला आहे.
‘ओह माय गॉड’च्या या सिक्वेलचा टीझर ११ जुलैला रिलीज होणार आहे. या घोषणेसोबतच यूजर्सनी मेकर्सना सूचनाही द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने एक छोटी क्लिप शेअर करून चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता महादेवा सारख्या रुपात दिसत आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ घातली आहे. डोक्यावर लांब जटा धारण केल्या आहेत. कपाळावर भस्म फासले आहे आणि गळ्याला देखील निळा रंग दिसला आहे. तर, व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘हर हर महादेव’च्या घोषणा ऐकू येत आहेत.
अक्षय कुमारचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. मात्र, काही लोकांनी त्याचा हा लूक पाहून आधीच धोशा कार्याला सुरुवात केली आहे. या चित्रपटातून सनातन धर्माचा अपमान होता कामा नये, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. चित्रपटांमध्ये कोणत्याही धर्माची खिल्ली उडवू नयेत, तसेच हिंदूंच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाऊ नयेत, असे देखील म्हणत आहेत.
यावेळी एक वेगळीच कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा लैंगिक शिक्षणाभोवती फिरत असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाला वादांपासून दूर ठेवण्यासाठी चित्रपटात कोणाच्याही भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाणार नाहीत, याची निर्मात्यांनी विशेष काळजी घेतली आहे. अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या ‘गदर २’सोबत पाहायला मिळणार आहे. या दोन्ही चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.