महाराष्ट्रात सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासच उरले आहे तरीही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही, एबी फॅार्म मिळाले नाहीत. राजकीय वर्तुळात एका शब्दाची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे—तो म्हणजे एबी फॉर्म.
ज्यांना एबी फॉर्म मिळतो, त्यांच्या गळ्यात माळ, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि “तिकीट पक्कं” अशी चर्चा सुरू होते. पण हा एबी फॉर्म नेमका असतो तरी काय? निवडणुकीत त्याला इतकं महत्त्व का असतं? आणि उमेदवार त्यासाठी इतकी धडपड का करतात? चला, जाणून घेऊयात सविस्तर…
एबी फॉर्म म्हणजे काय?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ओळख मिळवण्यासाठी आणि त्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एबी फॉर्म सादर करणे अनिवार्य असते. हे फॉर्म दोन भागांत असतात—ए (A) फॉर्म आणि बी (B) फॉर्म.
ए (A) फॉर्म – अधिकाराचं पत्र
ए फॉर्म हा राजकीय पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला जाणारा अधिकृत दस्तऐवज असतो. यात पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव हे स्पष्ट करतात की, उमेदवार निश्चित करण्याचा आणि बी फॉर्मवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार कोणत्या पदाधिकाऱ्याला देण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर, हा “अधिकृत परवानगीपत्र” असतो.
बी (B) फॉर्म – उमेदवारीचा शिक्का
बी फॉर्ममध्ये प्रत्यक्ष उमेदवाराचे नाव, पत्ता आणि मतदारसंघ नमूद केलेला असतो. या फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी असते. विशेष म्हणजे, बी फॉर्ममध्ये दोन नावे असतात—
• एक मुख्य उमेदवार
• आणि एक पर्यायी उमेदवार
जर मुख्य उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाला, तर पक्षाचे चिन्ह आणि उमेदवारी आपोआप पर्यायी उमेदवाराला मिळते.
एबी फॉर्म नसेल तर काय?
एखाद्या उमेदवाराने पक्षाच्या नावाने अर्ज भरला, पण एबी फॉर्म सादर केला नाही, तर त्याला त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळत नाही. असा उमेदवार अपक्ष समजला जातो. इतकंच नाही, तर एबी फॉर्मशिवाय पक्षाचा दावा न्यायालयातही मान्य केला जात नाही.
का आहे एबी फॉर्मची एवढी चर्चा?
महापालिका असो वा विधानसभा—एबी फॉर्म मिळणं म्हणजे पक्षाने उमेदवारावर अधिकृत शिक्कामोर्तब करणं. त्यामुळेच कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नेतेमंडळींमध्ये हा फॉर्म मिळवण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते.
विशेष म्हणजे, राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी याच फॉर्म्सना एए (AA) आणि बीबी (BB) अशी नावे दिली जातात.
सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना, सर्वच पक्षांकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू आहे. आता राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेत आहे—कोणाला मिळतो एबी फॉर्म आणि कोणाचं तिकीट कापलं जातं?


