पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. त्यातच आज होणाऱ्या मतदानामध्ये खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघाचा समावेश आहे. ममता बॅनर्जींमसोर त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी सुवेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. मात्र मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पहायला मिळत आहे.
नंदीग्राम येथील मतदान केंद्रावर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ममता बॅनर्जीदेखील नंदीग्राम येथील मतदान केंद्राबाहेर थांबल्या असून तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गोंधळ घालण्यासाठी बाहेरील लोकांना येथे आणण्यात आल्याचा आरोप केला. त्यांना खासकरुन याच कामासाठी आणण्यात आल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रीय यंत्रणा मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रात प्रवेश करु देत नसल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील मतदान केंद्राबाहेर आंदोलनच सुरु केलं आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट राज्यपालांना फोन केला आणि स्थानिकांना मतदान करु दिलं जात नसल्याची तक्रार केली.
“केंद्रीय यंत्रणा स्थानिकांना मतदान करु देत नाही आहेत. सकाळपासून मी तक्रार करत आहे, पण आता मी तुम्हाला विनंती करत आहे. कृपया यामध्ये लक्ष घाला,” असं ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोनवरुन सांगितलं.
ममता बॅनर्जी आंदोलन करत असून मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूला भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. यावेळी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली जात आहे.