मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची सुरू असलेली पदयात्रा बुधवारी रात्री दहा वाजता पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत एक मराठा, लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण या घाेषणेने परिसर दुमदुमून गेला. दुपारी बारा वाजता नियोजित असलेली पदयात्रा रात्री दहा वाजता शहरात दाखल होऊनही लोकांमधील उत्साह कायम होता.दरम्यान, पदयात्रेमुळे सकाळपासून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
रात्री दहाच्या सुमारास लाखाेंचा संख्येने जरांगे-पाटील यांचे शहराच्या हद्दीत पिंपळेनिलख येथील रक्षक चाैकात आगमन झाले. जरांगे यांचे ठिकठिकाणी जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांनीही जरांगे यांचे स्वागत केले
मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू आहे. त्यांचा पाचवा दिवस हा पुण्यात गेला तर सहाव्या दिवसाची सुरुवात आणि अख्खी रात्र पिंपरी- चिंचवड शहरात गेली आहे. ठिक- ठिकाणी स्वागत होत आहे. मनोज जरांगे यांचं डांगे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ पहाटे चारच्या सुमारास आगमन झालं. सर्व मराठयांनी २६ जानेवारी रोजी मुंबईला यावं असं आवाहन करत गेली दोन दिवस झाले सतत बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. पण, लेकरांसाठी संघर्ष असून हा शेवटच्या टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सलग दोन दिवस बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. माझा आवाज पण निघत नाही. तुम्हाला विनंती आहे की, आपल्या लेकरांसाठी हा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आला आहे. मावळातील सर्व मर्द मावळ्यांनी २६ जानेवारीला मुंबईत यावं. आरक्षणाची शर्यत जिंकायची आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लढतो आहोत. आपण सर्व जण एकत्र लढू, समाजाला पाठबळ देण्याची हीच वेळ आहे. तुम्ही सर्व मुंबई ला या. अस आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.