चिंचवड मतदारसंघातील कामगार वर्गापर्यंत कमळ पोहचविण्याचा संकल्प
चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे. शंकरभाऊंना मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मताधिक्याने आमदार पदी निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल असा संकल्प, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या हजारो सभासदांनी केला.
वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक कामगार युनियन महासंघाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला शहरातील जवळपास १३०० हुन अधिक सभासद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
“सध्या समाजातील तरुणांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे आणि वाममार्गाला लावण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र शंकरभाऊ आणि अनुप मोरे यांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत हजारो युवकांचे कुटुंब सावरण्याचे आणि आमची आर्थिक उन्नती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही कायम शंकरभाऊसोबत आहोत. व या निवडणुकीत एकजुटीने त्यांनाच आमदार करण्यासाठी काम करणार”, अशी भावना युनियनच्या पदाधिकारी व सभासदांनी व्यक्त केली.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शेखर चिंचवडे, युवा मोर्चाच्या सचिव तेजस्विनी कदम, माथाडी युनियनचे बाबू भोंडवे, प्रवीण यादव, इम्रान पानसरे, ऋत्विक कुटे, अजय थोरात, रोहन पवार, महेश पवार, सागर वाघमोडे, बबलू जोगदंड, विकी भिसे, गोट्या शर्मा, अमर गावडे, आकाश रणदिवे यांच्यासह भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.