नाट्यकलेची उर्मी आपल्याला आपल्या घरातूनच मिळते. मोठेपणी ती कला आपल्याला विकसित करता येते. मात्र त्यासाठी उत्तम मार्गदर्शनाची जोड असल्यास ती कला बहरते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार सतिश आळेकर यांनी चिंचवड येथे केले. ललित कला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा थिएटर वर्कशॉप कंपनी संचलित नाट्य अभिनय प्रमाणपत्रच्या दुस-या अभ्यासक्रम वर्गाच्या मार्गदर्शनावेळी ते बोलत होते.
ललित कला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा थिएटर वर्कशॉप कंपनी संचलित नाट्य अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम थिएटर वर्कशॉप कंपनीच्या पैस रंगमंच येथे सुरु आहे. अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी ललित कला केंद्र (गुरुकुल) चे विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आळेकर म्हणाले की, नाटकाची चळवळ पिंपरी चिंचवड शहरात सुरु आहे ही कौतुकाची बाब आहे. पिंपरी चिंचवड हे पुण्याच्या शेजारचे शहर असून ते विकसित होताना पाहता आले आहे. शहर वेगाने विकसित झाले असून त्याच्या सांस्कृतिक जाणीवा देखील बदलताना पाहिल्या आहेत. शहरीकरण झाल्यानंतर घड्याळाच्या काट्यासह सांस्कृतिक जाणीवा अबाधित असल्याने येथे कलेला पूरक वातावरण आहे. कला क्षेत्र हे निसरडे आणि अनिश्चिततेचे आहे. त्याबाबतची आवड असेल तर परिश्रमानंतर नक्कीच उत्तम कलाकार म्हणून प्रवास सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी नाटकाचा आतापर्यंतचा इतिहास कथन केला.
यावेळी बोलताना प्रविण भोळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. प्रवेश संख्या मर्यादित असल्याने सर्वांना प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ललित कलांचे शास्त्रोक्त याच विचाराने आम्ही नाट्यसंस्थांसह अंशकालीन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात थिएटर वर्कशॉप कंपनी या संस्थेसह आम्ही अभ्यासक्रम घेत आहोत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त शिक्षण घेणे शक्य होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पवार यांनी केले. यावेळी पहिल्या नाट्यवर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.