रोज १०,००० पावलं चालणं अनेक आजारांपासून सुटका देतं असं आतापर्यंत अभ्यासातून सांगण्यात आलं होतं. पण आता नव्या रिसर्चनुसार, केवळ ४००० पावलं रोज चालणं हे आजारपणासाठी एखाद्या जादुई औषधासारखे आहे. ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकसारख्या आजारांच्या धोक्यापासून तुम्ही दूर राहाल.
रोज चालणे यापेक्षा चांगला पर्याय वजन नियंत्रणात राखण्याचा असूच शकत नाही. इतकंच नाही चालण्यामुळे अनेक आजारही दूर राहतात. अभ्यासात सांगण्यात आल्याप्रमाणे १०००० पावलं रोज चालायला हवीत. मात्र नव्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आल्यानुसार, रोज तुम्ही १.५ वा २ किलोमीटर पायी चाललात तर अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
यासाठी रोज तुम्हाला १५-२० मिनिट्स चालण्याची गरज आहे आणि साधारण ४००० पावलं चालावी लागतील. इतकंच नाही तर ४ हजार पावलं चालल्यामुळे हार्ट अटॅक अथवा मृत्यूचा धोका कमी होतो असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. हा अभ्यास युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
अभ्यासानुसार, २२६,८८९ लोकांच्या दिनचर्येवर लक्ष ठेवण्यात आले आणि विश्लेषण करण्यात आले. विश्लेषणानुसार रोज तुम्ही जितके चालता त्यामध्ये किमान १००० पावलं अधिक चाललात तर तुमच्या मृत्यूचे प्रमाण १५% कमी होईल असं सांगण्यात आले.
तसंच तुम्ही ५०० पावलं जास्त चालण्याचे ध्येय जरी ठेवले तरी तुमच्या मृत्यूचे प्रमाण ७% कमी होईल असे सांगण्यात आले आहे. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, एखाद्या औषधाप्रमाणेच पायी चालण्याचा शरीराला फायदा मिळतो.