आकाशवाणीवर मनोरंजनासाठी ऐकल्या जाणाऱ्या विविधभारतीच्या प्रक्षेपणाला आता ‘मराठी मायबोली’चा साज लाभणार आहे. विविधभारतीवरील ‘आज के फनकार’, ‘भूले बिसरे गीत’, ‘छायागीत’ यासारख्या हिंदी कार्यक्रमांच्या जागेवर मराठी कार्यक्रम प्रसारित केले जाणार असून, हिंदी कार्यक्रम ऐकण्यास उत्सुक श्रोत्यांना कदाचित ‘बेला के फूल’ आणि ‘मधुमालती’ यासारख्या एक-दोन कार्यक्रमांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. पुढील दोन महिन्यांत हे बदल अपेक्षित असून, त्यानंतर १०१.० मेगाहर्ट्झवर १६ ते १८ तास मराठी मायबोलीची धून वाजण्याची शक्यता आहे.
आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांनी दुपारी ११ ते २ या वेळेत मुंबईचेच प्रक्षेपण सहक्षेपित करण्याचा निर्णय लागू केल्यानंतर आता विविधभारतीच्या प्रसारणात बदल होण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. विविधभारतीवरून आता प्रामुख्याने मराठी कार्यक्रम ऐकवले जाणार आहेत. लवकरच विविधभारतीचे ‘मराठी मायबोली’ वाहिनीत रुपांतर होण्याची चिन्हे आहेत. त्यावर प्रामुख्याने मराठी गाणी, मनोरंजनात्मक कार्यक्रमच प्रसारित होतील. त्याची पूर्वतयारी व आखणी तसेच प्रोग्रॅमिंग सुरू झाले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सुमारे १६ तासांहून अधिक काळासाठी फक्त मराठीच आशय प्रसारित करणे, हे आकाशवाणीसाठीही आव्हानात्मक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच, मराठी प्रसारणावर भर दिल्याने हिंदी सिनेगीतांवर प्रेम करणाऱ्या रसिक श्रोत्यांना त्यांच्या आवडीच्या कार्यक्रमांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत विविधभारतीवरून दिल्ली केंद्र आणि पुणे केंद्र अशा दोन्ही केंद्रांचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. मराठी कार्यक्रमांबरोबरच ‘आज के फनकार’, ‘भूले बिसरे गीत’, ‘छायागीत’, ‘सखी सहेली’, ‘हवामहल’, ‘एसएमएस के बहाने”जयमाला’ अशा केंद्रीय प्रसारणाच्या हिंदी कार्यक्रमांनाही पुणे जिल्ह्यात मोठा श्रोतुवर्ग लाभला आहे. नवा बदल लागू झाल्यानंतर यापैकी काही कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येणार नाहीत, अशी शक्यता आहे.
या प्रसारणासंदर्भातील निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. मात्र, एकूण आदेशांनुसार विविध भारती केंद्रावरून प्रामुख्याने मराठी कार्यक्रम प्रसारित होतील. तर काही प्रमाणात केंद्रीय प्रसारणाच्या माध्यमातून हिंदी कार्यक्रमांचा आनंदही श्रोत्यांना घेता येईल. मात्र, त्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आकाशवाणीच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
हिंदी कार्यक्रमांसाठी अॅपचा आधार
ज्या रसिक श्रोत्यांना केवळ हिंदी गाण्यांचा, कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना आकाशवाणीच्या मोबाइल अॅपचा आधार घ्यावा लागेल. प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवरून त्यांना विविधभारतीच्या केंद्रीय प्रसारणाच्या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.