Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमी"विशाल निकम" ठरला बिग बॉस मराठी ३ चा विजेता…!

“विशाल निकम” ठरला बिग बॉस मराठी ३ चा विजेता…!

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. यंदाच्या तिसऱ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आज बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. विशाल निकम हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर विशाल निकमनं सिझन तीनच्या विजेत्याचा किताब पटकावला आहे.

काल (२६ डिसेंबर) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. या सर्व स्पर्धकांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

बिग बॉस मराठीच्या या सोहळ्याचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी यावेळी बिग बॉसच्या यंदाच्या ट्राफी कशी असणार याची झलकही दाखवली. विशेष म्हणजे यानंतर बिग बॉसमधील मिनल शहा, जय दुधाणे, विशाल निकम , विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे या टॉप ५ स्पर्धकांचा जबरदस्त डान्सही पाहायला मिळाला.

यादरम्यान मिनल शहा ही बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर उत्कर्ष शिंदेंनेही एक्झिट घेतली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. दरम्यान या तिघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाले. यातील विकास पाटील हा स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर जय आणि विशाल या दोघांमध्ये विशाल निकम हा बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.

कोण आहे विशाल निकम?
विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अमृता धोंगडे ही अभिनेत्री होती. त्यानंतर विशालनं धुमस या मराठी सिनेमातही काम केलं. परंतु विशालला लोकप्रियता मिळाली ती दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जय भवानी जय शिवाजी या टीव्ही मालिकांमुळं. आता बिग बॉस मराठी ३ घरात आल्यानंतर त्याचा चाहतावर्गही वाढला आहे.

दरम्यान यानंतर सर्वत्र विशाल निकम याचे तोंडभरुन कौतुक केले. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर विशालच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावरही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments