आयसीसीने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यजमान भारत ८ ऑक्टोबरपासून या मेगा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दरम्यान विराट कोहलीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आयसीसीने मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान मेगा इव्हेंटचे वेळापत्रक सुरू होण्याच्या १०० दिवस आधी जाहीर केले. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे, तर यजमान भारत ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारतीय संघाAचा माजी कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
या मैदानावर अनेक चांगल्या आठवणी –
आयसीसीने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर विराट कोहलीसोबतच्या संभाषणाचा व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहली म्हणाला की, “विश्वचषकादरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या मैदानावर अनेक चांगल्या आठवणी आहेत. तेच वातावरण पुन्हा अनुभवायला मिळणं खूप छान असणार आहे. देशांतर्गत विश्वचषक खेळणे खूप खास आहे. मला २०११ मध्ये वरिष्ठ खेळाडूंना पाहून त्यांच्यासाठी काय अर्थ आहे हे समजले.”
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच भारत एकट्याने ही मेगा स्पर्धा आयोजित करत आहे. यापूर्वी, १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने आशियाई उपखंडातील पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांसोबत या स्पर्धेचे आयोजन केले होते.
भारत आपले सामने ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळणार –
या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सर्वाधिक प्रवास करेल. संघ आपले सामने ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना २ नोव्हेंबरला मुंबईच्या मैदानावर क्वालिफायर २ संघाविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळेल. कोहलीने २०११ साली भारतासाठी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महत्त्वपूर्ण वेळी ३५ धावांची खेळी खेळली होती.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाचे वेळापत्रक –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनऊ
भारत विरुद्ध क्वालिफायर – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर – ११ नोव्हेंबर, बंगळुरू
१५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने –
भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने असतील. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ १५ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.