त्र्यंबकेश्वर मंदिरात होत असलेल्या विधीवत पूजेवरून पुरोहितांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सात जणांना अटक केली आहे.
त्र्यंबकेश्वरला विधी करण्यासाठी यजमान पळविल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे दोन पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याचं समोर आले आहे. यावेळी एका पूजाऱ्याने स्वतः कडील गावठी कट्टा दुसऱ्या पुजाऱ्यावर रोखला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सात संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्र्यंबकेश्वरला पूजाविधी करण्यासाठी आलेल्या यजमानांना पळविल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून हस्तक्षेप करत ही हाणामारी रोखली. तर पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा व ११ जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.