१ जानेवारी २०२०,
१ जानेवारी १८१८ मध्ये याठिकाणी झालेल्या लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या महार रेजिमेंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.भीमा कोरेगामध्ये मधल्या काळात काही घटना घडल्या होत्या. पण, सरकार त्यासंदर्भात काळजी घेत आहे. आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कुणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला,तर त्यावर विश्वास ठेवू नये. शांतता ठेवावी,असं आवाहनही त्यांनी केली. पुणे येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयात केलेल्या तोडफीडीच्या तसेच, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नाराजी प्रकरणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नास उत्तर देतांना सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना तीन राजकीय पक्षांची आघाडी करून व अन्य देखील काही मित्रपक्षांना बरोबर घेण्यात आले आहे. या सर्वांना घेऊन मंत्रिमंडळ आज अस्तित्वात आलेलं आहे. २८८ जागांपैकी ४३ जणांनाच मंत्रिमंडळात घेता येतं. अनेकांची इच्छा असते की आम्हाला देखील संधी मिळावी. प्रत्येकाचे ध्येय असतात, काही स्वप्न असतात व यात जर काही मनासारखं झालं नाहीतर त्यांना दुःख होतं, त्यांचे कार्यकर्ते देखील दुखावतात व त्यातुन कधीतरी अशाप्रकारच्या घटना घडतात. परंतु यावर चर्चेतुन मार्ग काढता येतो. त्याद्वारे त्यांना शांत करता येतं, काही दुसरा विचार देखील त्यांचाबद्दल करता येतो. हे सर्वच राजकीय पक्षांना करावं लागतं. आमचं महाविकासआघाडीचं सरकार आलं आहे म्हणून केवळ आम्हालाच असं करावं लागतं अशातला काही भाग नाही, इतरांवर देखील अशाप्रकारचे प्रसंग येत असतात. परंतु आम्ही त्याला व्यवस्थिपणे हाताळण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत, त्या भावनांचा देखील आम्ही त्या ठिकाणी आदर करू व योग्य पद्धतीचा मार्ग काढू.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राजशिष्टाचार विभागाचं हे काम असतं, शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी असते, वास्तविक कोणी निमंत्रण दिलं नाही, कशामुळे हे घडलं याबाबतची माहिती घेण्यात येईल व पुन्हा अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत, याबदद्लची खबरदारी देखील घेतली जाईल, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.