Sunday, May 17, 2026
Homeआरोग्यविषयकबेशिस्त केबल जंजाळाचा बळी; निगडी प्राधिकरण परिसरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बेशिस्त केबल जंजाळाचा बळी; निगडी प्राधिकरण परिसरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे आणखी एक निष्पाप जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही दुर्घटना निगडी प्राधिकरण परिसरात घडली असून शहरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे आजीव सदस्य संदीप पटवर्धन यांच्या पत्नी आणि महिला विभागाच्या कोषाध्यक्षा सौ. संपदा संदीप पटवर्धन (वय अंदाजे …) यांचे मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

तीन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्या घरातून स्कूटरवर बाहेर पडत असताना रस्त्यावर बेशिस्तपणे लटकत असलेल्या इंटरनेट/केबल वायरमध्ये त्यांचा गळा अडकला. या धक्क्यामुळे त्या जोरात खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्या गेल्या तीन दिवसांपासून जीवन-मरणाशी झुंज देत होत्या.

या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरभर अनियंत्रित बांधकामे आणि रस्त्यांवर सैल सोडलेल्या इंटरनेट, वाय-फाय व डिशच्या केबल्समुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही दुर्घटना महापालिकेच्या उपमहापौरांच्या वार्डातच घडल्याने परिस्थितीची गंभीरता अधिकच वाढली आहे.

सौ. संपदा पटवर्धन यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करून शहरातील केबल जंजाळ तात्काळ हटविण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments