Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीमहापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक,कवी,साहित्यिक तसेच अभिनेते व दिग्दर्शक रमेश...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक,कवी,साहित्यिक तसेच अभिनेते व दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा मानपत्र देऊन गौरव…

पिंपरी चिंचवड शहराच्या साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुआयामी योगदान देणारे ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

     पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आयोजित सभेत रमेश वाकनीस यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

     यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, राजू मिसाळ, शैलजा मोरे, अमित गावडे तसेच अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    रमेश वाकनीस यांनी कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी साहित्य व रंगभूमीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. “पूर” आणि “आकाशा आणि काही कविता” हे त्यांचे कवितासंग्रह तर “ओळखावा धोंडा अंतरीचा” आणि “कहाणी अखेरच्या संपाची” ही त्यांची नाटके विशेष गाजली आहेत. प्राचीन पाली भाषेतील “धम्मपद” या धर्मग्रंथाचा मराठी काव्यानुवाद करून त्यांनी साहित्य आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणला आहे.

     रंगभूमीवरील अभिनय, दिग्दर्शन आणि बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये कलासंस्कार रुजविण्याचे कार्य केले आहे. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले असून त्यांच्या या बहुआयामी योगदानाचा गौरव म्हणून महापालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानपत्राचे वाचन केले.

    यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “रमेश वाकनीस यांनी साहित्य, नाटक, अभिनय, दिग्दर्शन आणि संस्कृतीसंवर्धन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे.त्यांचे संवेदनशील लेखन, प्रभावी रंगकर्म आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य व रंगभूमी समृद्ध केली असून पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments