Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन; संगीतविश्व शोकाकुल ,...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन; संगीतविश्व शोकाकुल , आज होणार अंत्यसंसकार 

भारतीय संगीत क्षेत्रातील एक झळाळते नक्षत्र आणि कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी शनिवारी उशिरा निधन झाले. छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना प्रकृती खालावत गेल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती पुत्र आनंद भोसले यांनी दिली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आशाताईंच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीतविश्वासह विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

‘एका युगाचा अंत’ – आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, “एका युगाचा अंत झाला आहे. स्वतःच्या वेदना विसरून त्यांनी आपल्या सुरांनी जगाला आनंद दिला. त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे.” राज्य सरकारतर्फे त्यांना शासकीय सन्मानाने निरोप दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैदिप्यमान कारकीर्द

८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले या मंगेशकर कुटुंबातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ होत्या. १९४३ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि पुढील सात दशकांहून अधिक काळ त्यांनी संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवले.

शास्त्रीय, सुगम, पॉप, कॅब्रे ते गझल अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपली मोहोर उमटवली. विविध भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली आणि अनेक अजरामर गीते रसिकांना दिली.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार तसेच अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

संगीतविश्व पोरके

सात दशकांहून अधिक काळ आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने केवळ मंगेशकर कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण कलाविश्व पोरके झाले आहे. त्यांच्या स्वरांचा ठेवा मात्र कायमच रसिकांच्या हृदयात घुमत राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments