औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे. कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या शहरातील नामवंत व्यक्तिमत्त्वांचा विशेष सोहळ्यात गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.
सांस्कृतिक वारसा जपणे ही आमची जबाबदारी – महापौर
या उपक्रमाबाबत बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर केवळ उद्योगातच नाही, तर कला आणि साहित्यातही अग्रेसर आहे. अनेक ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या कर्तृत्वाने शहराची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. अशा दिग्गजांचा सन्मान करणे ही महापालिकेची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. या सत्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि शहरातील सांस्कृतिक चळवळीला नवचैतन्य प्राप्त होईल.”
शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या मान्यवरांचा होणार सन्मान क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने सन्मानित केल्या जाणाऱ्या कलाकारांची प्राथमिक यादी निश्चित केली आहे. समितीचे सभापती कैलास कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन्मानित होणारे मान्यवर कलावंत पुढील प्रमाणे- अभिनेते व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ चिटणीस मधुकर जोशी, तबलावादक धोंडीराम सायकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पद्मश्री नंदकिशोर कपोते, लेखक रमेश वाकनीस, अभिनेते व दिग्दर्शक सुहास जोशी, साहित्यिक, व्याख्याते व कामगार नेते अरूण बोऱ्हाडे, लेखिका कल्पना क्षीरसागर, लेखिका वंदना घांगुर्डे, शास्त्रीय संगीत गायक पंडित चव्हाण, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, भरतनाट्यम नृत्यांगना गीता शर्मा, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते डॉ. संजीवकुमार पाटील, चित्रकार प्रफुल्ल भिष्णूकर, क्रीडा शिक्षक आणि लेखक डॉ. मनोज देवळेकर, कथ्थक नर्तिका वैशाली धोंगडे, अभिनेते, दिग्दर्शक व संगीतकार श्रीकृष्ण (समीर) कालमित्रा, कवियित्री सीमा गांधी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रकार संजय काळभोर या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे.
या सोहळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून, लवकरच एका भव्य कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.


