रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंजत होते.
ऐंशी ते नव्वदच्या दशकांत विजय कदम यांनी रंगभूमीवर केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ‘टूरटूर’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांतून त्यांनी काम केले होते. दूरचित्रवाहिनीवर ‘ती परत आलीये’ या मालिकेत त्यांनी केलेली भूमिका अखेरची ठरली. ‘तेरे मेरे सपने’, ‘इरसाल कार्टी’, ‘दे दणादण’, ‘दे धडक बेधडक’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्या तरी विनोदी अभिनेता म्हणून ते अधिक लोकप्रिय ठरले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.