Sunday, July 14, 2024
Homeताजी बातमीज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन, वयाच्या ८३ वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन, वयाच्या ८३ वर्षी घेतला अखेरचा श्वास


६ डिसेंबर २०२०,
ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रात्री निधन झाले. वयाच्या ८३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले होते. त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व, झुपकेदार मिशा आणि कडक आवाजाने त्यांच्या अनेज भूमिका गाजल्या. गावातील ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका त्यांनी उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत ते भूमिका साकारत होते. ही त्यांची अखेरची मालिका ठरली

बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.

वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.

वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले. रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहायचे. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments