७ जुलै २०२१,
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.
दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील.
पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी मुघल-ए-आजम, देवदास, नया दौर, राम और श्याम असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.