Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीमहापालिकेच्या समाज विकास विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध मागासवर्गीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग व कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यापैकी मागासवर्गीय कल्याणकारी योजनेमध्ये माता रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महर्षी वाल्मिकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या योजनांचा समावेश आहे.

माता रमाई आंबेडकर योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये तर ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत १२ वी नंतरचे वैद्यकीय अभ्यासक्रम (एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस, बी.डी.एस, बी.यु.एम.एस, बी.एच.एम.एस), अभियांत्रिकी पदवी बी.आर्क, बी.पी.टी.एच, बी.फार्म, बी.व्ही.एस.सी, आभियांत्रिकी ए.एन.एम, जी.एन.एम आणि बी.एस्सी नर्सिंग पदवीसारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमवर्षी एकदाच २५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

महर्षि वाल्मिकी योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वी वर्गात शिकत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींना सायकल घेण्यासाठी एकदाच ७ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय युवक युवतींना प्रथम वर्षासाठी एकदाच १ लाख ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थीस प्रशिक्षण फी मध्ये ९० टक्के सवलत देण्यात येणार असून यासोबतच महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) मार्फत एम.के.सी.एल अंतर्गत एमएस-सीआयटी, डी.टी.पी, टॅली आणि के.एल.आय.सी या संगणक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

या सर्व योजनांची सविस्तर माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in अधिकृत संकेतस्थळावरील समाज विकास विभाग या पर्यायावर उपलब्ध असून अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, अटी शर्ती, लाभाच्या स्वरूपाची माहितीही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त लाभार्थींनी दिलेल्या मुदतीत वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments