पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईन टाकणे, शहरातील दिव्यांची देखभाल व दुरुस्ती, दफनभूमींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरीसाठी होणाऱ्या खर्चालाही मान्यता देण्यात आली.
तसेच मनपा हद्दीत मालमत्ता कराची बिले वाटप करणाऱ्या महिला बचत गटांनी नवीन मालमत्ता शोधून काढल्यास त्यांना मनपाच्या करसंकलन विभागाने मंजूर केलेल्या दराने मानधन देण्याच्या उपसूचनेलाही मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत बचत गटांतील महिलांमार्फत अर्ज भरून घेण्याचे काम करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे या संस्थेला जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता देण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मान्यता दिली.
आजच्या बैठकीत शहरातील पाणी व नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुल ते जाधववाडी पंपहाऊसपर्यंत पाईपलाईन टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक (देहू-आळंदी रोड) दरम्यान पाईपलाईन टाकणे, काळेवाडी तसेच प्रभाग क्र. १६ आणि १७ मधील दिव्यांची देखभाल व दुरुस्ती करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली.
याशिवाय मोशी येथे दफनभूमी विकसित करून विद्युत कामे करणे, यमुनानगर रुग्णालय व निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे जनित्र संच बसविणे, भक्ती-शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, मनपा शाळा, कार्यालये व दवाखान्यांमधील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करणे या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
तसेच भामा आसखेड धरणावरील जलउपसा केंद्र ते नवलाख उब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मिमी व्यासाची रायझिंग मेन टाकणे आणि बीपीटी ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मिमी व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकण्यासाठी अडथळा ठरणारे उच्चदाब खांब व तारा स्थलांतरित करण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.
याशिवाय शहरातील विविध स्मशानभूमी व दफनभूमींच्या काळजीवाहक संस्थांना मुदतवाढ देणे, तसेच शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी नियुक्त महिला बचत गटांना देय असलेल्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान देण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मान्यता दिली.
या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य आणि महापालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


