राज्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून संचारबंदी तर दिवसा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. पण याच काळात येत्या 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही असून, यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
“महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.