२० जानेवारी २०२०,
मावळ तालुक्यात 250 हेक्टरवर गुलाब क्षेत्र असून, यामध्ये 30 टक्के खासगी कंपनी व 70 टक्के शेतकरी उतरला असून, अनेक प्रकारच्या जातींचे व रंगाचे गुलाबांचे उत्पादन घेतले जाते. मुख्यत्व व्हॅलेंटाइन लाल रंगाच्या (टॉप सिक्रेट या जातीच्या) फुलांना अधिक मागणी असते. लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो.त्यामुळे या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी शेतकरी वर्ग 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत करतो. त्यामध्ये कटिंग, बेडींग केली जाते. त्याची योग्यरित्या मशागत करून त्यांना ‘टॉनिक’ दिले जाते. ज्यादा उत्पादन मिळावे म्हणून, त्याला सेंद्रिय खतांची व औषध फवारणी केली जाते.
निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामध्ये वेगवेगळ्या ‘टॉनिक’चे डोस, औषध फवारणी, रासायनिक खते यावर खर्च करावा लागतो. 28 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात फुलांची निर्यात विविध देशात केली जाते केली जाते. 20 जानेवारी ते 26 जानेवारी या काळात निर्यातक्षम फुलांची पाहणी करण्यासाठी परदेशातील व्यापारी शेतकर्यांच्या पॉलिहाऊस’वर येतात. त्यामध्ये एक्सपोर्ट जातीच्या फुलांची पाहणी केली जाते. पाहणी केल्यानंतर त्याची किंमत ठरवून बुकिंग केले जाते. गेल्या दहा वर्षांपासून चांगले दर्जात्मक उत्पादन घेतल्याने परदेशात मावळातील गुलाब चांगलाच भाव खात आहे. परदेशातील व्यापारी 20 जानेवारीपर्यंत पॉलिहाऊसवर येऊन फुलांची पाहणी करून बुकिंग करतात. थंडी नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने उशिरापर्यंत मुक्काम मारल्याने हवामानातील सततच्या बदलामुळे अन्य शेती पिकांबरोबरच गुलाब शेतीलाही फटका बसला आहे. त्यामुळे निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी शेतकर्याचा खर्च दुपटीने वाढला आहे. थंडी नसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकर्यांना भेडसावत आहे.
शेतकरी दररोज जाऊन करतात पाहणी फूल उत्पादक शेतकर ज्ञानेश्वर आडकर म्हणाले की, ‘व्हॅलेंटाइन डे’च्या तयारीसाठी शेतकरी दररोज पॉलिहाऊसमध्ये जाऊन फुलांची पाहणी करतात. त्यावर रोग पडला आहे का, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी सतत काळजी घेत असतो. शीतगृहाचे निर्जंतुकीकरण करणे अशा कामसाठी शेतकरी सतत प्रयत्नशील असतो. या सर्व तयारीसाठी शेतकर्यांची लगबग मावळात सुरू आहे. पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकूंद ठाकर म्हणाले की, दोन महिने परिश्रम घेऊन फुलांचे उत्पादन घेतो. बेडिंग, कटिंग झाली असून, पॉलिहाऊसची स्वच्छता करणे, पॅकिंगची तयारी करणे आदी कामांनी वेग सुरू आहेत. आता आम्ही व्हॅलेंटाइन डे’ची प्रतीक्षा करीत आहोत.