Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीवडापाव 15 तर नाष्टा 38 रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर

वडापाव 15 तर नाष्टा 38 रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने उमेदवारांना विविध स्वरूपाचे दरपत्रक ठरवून दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 28 लाख होती. तसेच दरपत्रकापेक्षा अधिकचा खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्यास उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.

15 ऑक्टोबर रोजी केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्तेत असलेल्या पक्षांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी घोषणा किंवा नवीन योजना सुरू करता येत नाहीत. एकदा आचारसंहिता लागू झाली की उद्घाटने, लोकार्पण, भूमिपूजन असे कोणतेही कार्यक्रम करता येत नाहीत. सत्ताधाऱ्यांना निवडणूक प्रचारासाठी सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानांचा वापर करता येत नाही.

कोणताही पक्ष पोलिसांची परवानगी घेऊनच प्रचारसभा, मिरवणूक किंवा रॅली काढू शकतो. धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांकडे मतं मागणारा राजकीय पक्ष तसेच उमेदवारावर कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तसेच जात किंवा धर्माचा उल्लेख करून तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई असते. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही राजकीय झेंडे, बॅनर, जाहिराती, पत्रके असं काहीही लावण्यापूर्वी त्या जागेच्या मालकाची परवानगी आवश्यक असते. अशी परवानगी घेतली नसेल तर तो आचारसंहितेचा भंग ठरतो. अशातच आता निवडणूक आयोगाकडून उमेदवारांसाठी दरपत्रक जारी केले आहे.

प्रचार खर्चासाठी 252 पदार्थांच्या दराची सूची घोषित

प्रचार खर्चासाठी 252 पदार्थांच्या दराची सूची निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आली आहे. यानुसार, चहा 8 रुपये, कॉफी 12 रुपये, बिस्किटचा पुडा 10 रुपये, शीतपेय 20 रुपये, कोकम सरबत, लस्सी, पोहे, उपीट, शिरा प्रत्येकी 15 रुपये, वडापाव 10 रुपये, इडली 25 रुपये, मिसळ 49 रुपये, समोसा 15 रुपये, शाकाहारी जेवण 70 रुपये आणि मांसाहारी जेवण 120 रुपये, असे खाद्यपदार्थांचे दरपत्रक ठरवण्यात आले आहेत.

बँडपथकाचेही दर ठरले

निवडणूक आयोगाने प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांचे दरही ठरवले आहेत. दुचाकी एक दिवसासाठी 1 हजार 100 रुपये, रिक्शा 1 हजार 300 रुपये, हलके वाहन 3 हजार 300 रुपये, मध्यम वाहन 3 हजार 900 रुपये, उच्च दर्जाचे वाहन 5 हजार 100 रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. याशिवाय प्रचार करताना बँडपथकात 20 माणसांसाठी प्रतिदिन 1 हजार रुपये, 5 माणसांचे पोवाडा पथक असेल तर 5 हजार रुपये, 3 माणसांचे हलगी पथक असेल तर 1 हजार 500 रुपये, 20 जणांचे झांजपथक असेल तर 10 सहस्र रुपये, शिंगवादन प्रतिव्यक्ती 300 रुपये, बँजो ग्रुप 4 माणसांसाठी 3-4 तासांसाठी 2 हजार 500 रुपये, हॉटेल दरामध्ये नॉन एसी 1,650, एसी 3 हजार, फोर स्टार हॉटेल सूट 20 हजार, पाइव्ह स्टार हॉटेल सूट 50 हजार, याशिवाय बुके व्हीव्हीआयपी 1 हजार, पुष्पहार व्हीआयपी 12 फुटी डबल 2 हजार, पार्टी झेंडा एक फुटापर्यंत 25, पार्टी झेंडा दोन फुटापर्यंत 50, टोपी प्रतिनग 12 आणि स्कार्फ प्रतिनग 10 असे निश्चित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments