९ एप्रिल २०२१,
कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रे आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं तसं स्पष्ट केलं आहे. महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. महापालिकेची ५९ आणि खासगी २८ अशी ८६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या लसीकरण केंद्रांवर शहरातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाते. परंतु, लसीचा साठा उपलब्ध नसल्याने आज सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या केंद्रांमार्फत एक लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. तर, खासगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरातील एकूण दोन लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय, पुण्यात मगरपट्टा येथील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये आज लसीचे ५० डोस आले होते. एक तासात लसीकरण बंद पडले. तसंच, येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात आज सकाळीच लसीचा साठा संपला असून नागरिक लसीची वाट बघत आहेत.