पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणार्या योजना बारगळल्या आहे. महापालिकेच्या 28 शाळांमध्ये अजूनपर्यंत कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणार कसा? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
शहरात महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी मुख्याध्यापकांची 95 पदे मंजूर असताना फक्त 67 मुख्याध्यापक कार्यरत आहेत. 28 पदे रिक्त आहेत. एकीकडे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी भौतिक सुविधा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
तरी अनेक शाळांना मुख्याध्यापक नसल्याने आणि शिक्षकांची कमतरता असल्याने त्या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी अडचणी येत आहेत. शिक्षकभरती पवित्र पोर्टलव्दारे होत असल्यामुळे भरतीसाठी किती वेळ लागेल, यावर सर्व अवलंबून आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत उपसंचालकांनी मुख्याध्यापकांची 95 पदे मंजूर केली आहेत. यामध्ये सध्या फक्त 67 मुख्याध्यापक कार्यरत आहेत.
अशा एकूण 28 शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळेतील वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकांची जबाबदारी देऊन काम भागविण्यात येत आहे. नियमाप्रमाणे शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक असणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापकांची नियुक्ती अन्य शाळांमध्ये करता येते; परंतु त्यासाठी महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी फारसे गंभीर नाहीत.
कार्यरत शिक्षकांची कसरत
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळावे लागत आहेत. काही शाळांमध्ये शाळेतील उपशिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा पदभार दिलेला आहे.
या शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करायची, शिकवायचे अन् व्यवस्थापनही पाहायचे, अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षण हक्क कायद्याची येथे पायमल्ली होताना दिसत आहे. शिक्षक भरतीशिवाय प्रश्न सुटू शकत नाही. शिक्षक मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांची पवित्र पोर्टलव्दारे भरती कधी होणार आणि रिक्त जागा कधी भरणार? हा प्रश्न आहे.
शाळांमध्ये 74 शिक्षक गैरहजर
अद्यापही मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. बहुसंख्य शाळांमधून त्या शिक्षकाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेचे नियोजन केले जाते. तसेच महापालिका शाळांमध्ये शिकविणार्या शिक्षकांचीदेखील कमतरता आहे. शिक्षण विभागाने 285 प्राथमिक शिक्षकांची कंत्राटीपद्धतीने भरती केली. त्यापैकी 211 शिक्षक कार्यरत असून, 74 शिक्षक अद्याप गैरहजर आहेत.