कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस घेता येईल असं बायडेन यांनी सांगितलं.
यापूर्वी, अमेरिकेने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी जो बायडेन यांनी १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला कaरोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असं सांगितलं. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि ६२ दशलक्ष लोकांचं पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भारतातही वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करोनाची लस 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.