देशभरात तीसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांच्या वरच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरूवात झाली आहे. यातच उत्तर प्रदेशमध्ये लसीकरणावेळी गंभीर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या एका नर्सनं महिलेला कोरोनाची लस दोनदा दिल्याची घटना घडली आहे. ही लस दिल्यामुळे सदर महिलेचा हात दुखू लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. यानंतर संबंधित नर्सविरोधात तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची आरोग्य उच्चाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
कानपूरच्या या लसीकरण केंद्रावर सदर महिला लस घेण्यासाठी गेली असता तिची नोंदणी करण्यात आली. मात्र, तिला लस देणारी नर्स फोनवर बोलत होती. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर संबंधित नर्सने कागदपत्रे तयार केली. फोनवर बोलतच तिने त्याच महिलेला पुन्हा एकदा लसीचा डोस दिला. यानंतर महिलेला हातात दुखू लागल्यानंतर लस दिलेल्या ठिकाणी सूज आल्याची तक्रार महिलेने केली. तसेच, लसीचे दोन डोस का दिले? अशी विचारणा ही महिला करू लागली, तेव्हा घडलेला सगळा प्रकार लक्षात आला.
या सगळ्या प्रकाराच्या निषेधार्थ महिलेच्या नातेवाईकांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे.