देशातील सर्वाधिक उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. काल रात्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता. या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं. शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्यानं औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या सोहळ्यासाठी औरंगाबादकरांनी क्रांती चौकात एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे चंद्रकात खैरे, बाळासाहेब थोरात, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
या पुतळ्याची २१ फुट उंची आहे, पुतळ्याचे वजन ०७ मेट्रीक टन आहे, पुतळ्यासाठी ब्रांझ धातु वापरण्यात आलेला आहे, पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची ३१ फुट आहे, चौथाऱ्यासह पुतळ्याची एकुण उंची ५२ फुट, चौथाऱ्याचे बांधकाम आर. सी. सी. मध्ये असुन चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग करण्यात आले आहे, चौथाऱ्याभोवतीच्या २४ कमानीत २४ मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत.
चौथाऱ्याभोवती कारंजे तयार करण्यात आलेले असून, हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, नविन अश्वारूढ पुतळा तयार करण्यासाठी एकूण ९८.०० लक्ष रुपयांचा खर्च आला असून, चौथाऱ्याच्या बांधकामासाठी २५५.०० लक्ष रुपयांचे खर्च आले आहे. तसेच एकुण अंदाजपत्रकिय रक्कम ३५३.०० लक्ष होती.


