६ नोव्हेंबर २०२०,
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी पिंपरीतील केशव घोळवे यांची शुक्रवारी (दि.६) बिनविरोध निवड झाली.उपमहापौर निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, कदम यांनी मुदतीत माघार घेतल्याने घोळवे बिनविरोध उपमहापौर झाले.
उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर उपमहापौर कोण याबाबत चर्चांना उधाण आले होते. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष यांच्यात आपल्याच मतदारसंघातील नगरसेवकाला पद देण्याबाबत चढाओढ होती. मात्र भाजपमधील मुंडे गटाने मोर्चेबांधणी केली होती. आपल्याच गटातील नगरसेवकांला उपमहापौरपदाची संधी मिळावी यासाठी आमदार समर्थक प्रयत्न करीत होते. मात्र स्वतः पंकजा मुंडे यांनीच केशव घोळवे यांनाच पद देण्याची सूचना केली.
नगरसेवक केशव घोळवे हे संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून भाजपकडून निवडून आले आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते पहिल्यांदाच 2017 मध्ये नगरसेवक झाले आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना उपमहापौरपद मिळाले आहे.