पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली. बॅंकेच्या इतिहासात प्रथमच अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह बँकेच्या सर्व विद्यमान संचालकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भाजपनं जवळपास सर्वच जागांवर अर्ज भरले असून राष्ट्रवादी काँग्रेसपुढं आव्हान उभं केलं आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल २९९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर दहा जणांचे अर्ज बाद झाले. तर दहा जणांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतीशराव काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळं अजितदादांची बिनविरोध निवड झाली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे व संजय जगताप यांची याआधीच बिनविरोधी निवड झाली आहे.
पुणे जिल्हा बँक ही राज्यातील एक आघाडीची बँक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेवर अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. विशेष म्हणजे, अजितदादांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच याच बँकेतून झाली होती. तेव्हापासून, म्हणजेच १९९१ पासून अजित पवार या बँकेचं प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत सात वेळा अजित पवारांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलं आहे.