पिंपरी चिंचवड मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गुरुवार, १६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. याच रागातून आपल्या कारची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अनिता पांचाळ यांनी केला.
पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात अनिता पांचाळ राहतात. त्या आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा वावर त्या परिसरात वाढला आहे. रस्त्याच्या कडेला त्यांनी पार्क केलेली मोटार आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे.